विशाल शिंदे

पुणे , ता.7 : आज बकरी ईद असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील भोर, राजगड, वाई, महाबळेश्वर या पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी मुस्लिम समाजातील भाविक, शासकीय कर्मचाऱ्यांसह अनेक पर्यटक निघाले होते. मात्र, सातारा-पुणे महामार्गावरील अपूर्ण फ्लायओव्हर आणि शिवापूर टोल नाक्यावरील निकृष्ट दर्जाचे काम यामुळे रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

शिवापूर टोलनाका परिसरात फ्लायओव्हरचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, कामाचा दर्जाही अत्यंत खालावलेला आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. हा रस्ता आणि फ्लायओव्हर एक जूनपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अद्यापही ते अपूर्णच आहेत. यामुळे केवळ स्थानिकच नव्हे तर पर्यटक आणि प्रवाशांनाही अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, या कामामागे काही स्थानिक नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळेच काम उशिरा आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. स्थानिक आमदार, खासदार किंवा इतर नेत्यांनी यावर कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.
प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन रस्त्याचे आणि फ्लायओव्हरचे काम गुणवत्तेने व वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही संघटनांनी दिला आहे.







