पुणे : गेल्या महिन्यात मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील पूल कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले होते . मावळ मधील घडलेल्या घटनेनंतर जुन्या पुलांच्या नूतनीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. दरम्यान, मावळ दुर्घटनेनंतर जाग आलेल्या सरकराने शहरातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यास मंजुरी दिली आहे.

पालिकेच्या स्थायी समितीने तज्ज्ञ सल्लागार नियुक्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने शहरातील सर्व लहान- मोठ्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजरे यांनी सांगितले आहे.
शासनाच्या आदेशानुसार, शहरातील सर्व पूल, उड्डाणपूल, रेल्वे पूल, फुटओव्हर ब्रिज, भुयारी मार्ग, कल्व्हर्ट आदींचे स्ट्रक्चरल ऑडीट बंधनकारक आहे. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबवून स्ट्रक्टॉनिक कन्सल्टिंग इंजिनीअर्स या संस्थेची निवड केली आहे. या कामासाठी १.१८ कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहेत.
स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय?
स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे पुलाची संरचनात्मक तपासणी करणे. यामध्ये पुलाचे बीम, कॉलम, पिलर, पाया आणि इतर भाग तपासले जातात. तसेच, पुलाला भेगा, गंज, पाण्याची गळती किंवा इतर काही समस्या आहेत का, हे देखील पाहिले जाते.







