पुणे: शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या महिलांविरोधातील गुन्ह्यांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरण असो किंवा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, अशा अनेक धक्कादायक घटनांनी पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस विभागाने महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खास गस्त मोहिम सुरू केली आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील ३८१ मार्गांवर दररोज सुमारे १० ते ११ लाख प्रवाशांना सेवा पुरवते. यामध्ये लाखो महिला प्रवासी असतात. विशेषतः नोकरी करणाऱ्या महिलांसाठी पीएमपी बस सेवा हा एक महत्त्वाचा प्रवासाचा पर्याय आहे. मात्र, काही समाजकंटकांकडून बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांवर अश्लील चाळे, आय टिजिंग, चोरी, आणि अश्लील मजकूरांचे चित्रण यासारखे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिला प्रवाशांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत पीएमपीएमएलच्या विनंतीवरून पुणे पोलीस आयुक्तालयाने विशेष गस्त मोहिम हाती घेतली आहे. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पोलीस अधिकारी आणि २२ पोलीस कर्मचारी विविध बसमार्गांवर नियुक्त करण्यात आले आहेत. हे पोलीस अधिकारी व कर्मचारी गर्दीच्या वेळेत म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी थेट बसमधून प्रवास करणार असून गरज पडल्यास तत्काळ कारवाई करणार आहेत. मुख्य बसस्थानकांवर आणि बीआरटी मार्गांवर हे पोलीस उपस्थित राहणार आहेत.

फेब्रुवारी २०२५ मध्ये घडलेले स्वारगेट अत्याचार प्रकरण हे महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर मानले जाते. पहाटेच्या सुमारास गावाकडे जाण्यासाठी आलेल्या २६ वर्षीय तरुणीला आरोपी दत्ता गाडे याने फसवून बंद गाडीत बसवले आणि तिच्यावर अत्याचार केला. ही घटना अत्यंत वर्दळीच्या असलेल्या स्वारगेट बस डेपो परिसरात घडल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांवर मोठा दबाव असताना, श्वानपथक, ड्रोन कॅमेरे आणि १०० ते १५० पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला गेला. शेवटी ७५ तासांच्या शोधानंतर दत्ता गाडेला अटक करण्यात आली.
पुणे शहर पोलीस आणि पीएमपीएमएल यांनी एकत्रितपणे सुरू केलेली ही विशेष गस्त मोहीम महिला प्रवाशांसाठी सुरक्षिततेचा नवा आधार ठरणार आहे. महिला प्रवाशांनी कोणतीही शंका किंवा त्रास असल्यास थेट बसमध्ये उपस्थित असलेल्या पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.







