पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar And PM Modi) यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विचारपूस केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही फोन करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)

सोमवारी बारामती येथे असताना शरद पवार यांना प्रकृतीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तत्काळ पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांना खोकल्याचा त्रास होत होता आणि संसर्ग टाळण्यासाठी अँटिबायोटिक्स उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून मागील काही तासांत प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांना ठेवण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे. सुधारणा कायम राहिल्यास त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच अनेक कार्यकर्ते आणि समर्थक रुग्णालयाबाहेर जमू लागल्याने रुग्णालय प्रशासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेतृत्व मानले जात असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत राज्यभरातून चिंता व्यक्त केली जात होती. आता प्रकृतीत सुधारणा होत असल्याच्या बातमीमुळे कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.







