Pannalal Surana Passed Away: सोलापूर: समाजपरिवर्तन आणि समाजसेवेचे आयुष्यभर व्रत जपणारे ज्येष्ठ समाजवादी नेता आणि अनुभवी पत्रकार पन्नालाल सुराणा (Pannalal Surana) यांचे काल रात्री निधन झाले आहे. वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने राज्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील सात दशकांतील राज्याच्या परिवर्तनाचे ते थेट साक्षीदार होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, नळदुर्ग येथील ‘अपना घर’ येथे रात्री जेवणानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. अस्वस्थता वाढल्याने त्यांना उलटीही झाली. कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांचे पार्थिव आज शासकिय रुग्णालयात देहदान करणार आहे.
अनेक वर्ष त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रभावी भूमिका निभावली. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 9 जुलै1933 रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे त्यांचा जन्म झाला. शाळेत असतानाच ते राष्ट्रसेवा दलाशी जोडले गेले आणि सामाजिक-राजकीय कार्याची वाटचाल सुरू केली.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात पाऊल ठेवले आणि सुरुवातीला मराठावाडा दैनिकाचे संपादक म्हणूनही कार्य केले. शिक्षण, शेती, बेरोजगारी यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी प्रभावी लेखन करून अनेकांची मन जिंकली.





