Sasvad News : पुरंदर तालुक्यातील वनपुरी चौक परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका मेडिकल स्टोअरचे शटर उचकटून दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चोरट्यांनी केवळ रोख रक्कम किंवा मोबाईलच नव्हे, तर दुकानातील औषधे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी चक्क सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर (DVR) देखील लांबवला आहे. हि घटना 23 मार्च 2026 रोजी रात्री साडेनऊ वाजता ते पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी संतोष महादेव कामठे (वय-43, रा. कुंभारवळण, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासवड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष कामठे यांचे वनपुरी चौकात मेडिकलचे दुकान आहे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ते दुकान बंद करून घरी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. पहाटे साडेतीनच्या सुमारास वाल्मीक कुंभार यांनी संतोष कामठे यांना फोन करून दुकान उघडे असल्याचे सांगितले. कामठे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
यावेळी आत जाऊन पाहणी केली असता चोरट्यांनी 60 हजार रुपये किमतीची औषधे, १८ हजार रुपयांचा डीव्हीआर, 5 हजार रुपयांचे 4 सीसीटीव्ही कॅमेरे, 32 इंची मॉनिटर आणि 29 हजार रुपयांचा दुसरा मॉनिटर, 8 हजार आणि 35 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन. असा
एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
मेडिकलमध्ये चोरी केल्यानंतर चोरट्यांनी शेजारील डॉ. ऋतुजा फरांदे आणि मंगेश कमलाकर यांच्या दुकानांची शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने तिथून काहीही चोरीला गेले नाही. याप्रकरणी संतोष कामठे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.







