Pune : आनंद राठी वेल्थ कंपनीतील कार्यकारी संचालकासह 5 जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 33 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून हा प्रकार मे 2024 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान पुण्यात घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर हा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
या प्रकरणात कार्यकारी संचालक स्वपन चक्रवर्ती, सीईओ राकेश रावल, जॉईंट सीईओ फिरोजी अजीज, एचआर प्रमुख तेजल शाह आणि कार्यकारी संचालक सोनाली रावल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला कंपनीत काम करत असताना स्वपन चक्रवर्ती यांनी वेळोवेळी तिच्याशी अयोग्य वर्तन करून विनयभंग केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, संबंधित अधिकाऱ्याने महिलेला तक्रार न करण्यासाठी करिअर संपवण्याची धमकी दिली आणि तिचा पाठलाग केल्याचे नमूद आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्यानंतर महिलेने कंपनीच्या वरिष्ठांकडे तक्रार केली होती. मात्र, तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
तसेच, या प्रकरणाची माहिती देऊनही संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट फिर्यादी महिलेची दुबई येथे बदली करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.






