दौंड: तालुक्यातील पिंपळगाव (कानडखेल) येथील माजी सैनिक महेश पोपट ढमढेरे यांनी वयाच्या ४० व्या वर्षी स्पर्धा परीक्षेमार्फत तीन महिन्यात तीन शासकीय नोकऱ्या मिळवल्याने त्यांच्यावर पिंपळगाव गावातुन कौतुकाचा वर्ष होत आहे. महेश ढमढेरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत महसूल सहायक पद मिळवले तर जिल्हा परिषद वर्धा येथे आरोग्य सेवक, तर जिल्हा परिषद बुलढाणा येथे (कनिष्ट सहायक) अशा तीन शासकीय नोकऱ्या मिळवल्या आहेत. महेश ढमढेरे यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल पिंपळगाव (कानडखेल) येथील जय हनुमान मित्र मंडळ व ग्रामस्थांनी जंगी मिरवणूक काढत त्यांचे कौतुक केले .

माजी सैनिक महेश पोपट ढमढेरे हे आर्मी मध्ये इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनिअर या विभागात ऑटोमोबाईल इंजीनीअर हवालदार या पदावरती होते. तसेच 30 सप्टेबर 2021 रोजी डोकलाम चामना बॉर्डर या ठिकाणाहुन ते रिटायर झाले. त्यानंतर ते येथेच न थांबता त्यांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अभ्यास करत 3 वर्ष मेहनत घेतली आणि यश संपादन केले. महेश ढमढेरे यांच्या सत्कार कार्यक्रमानिमित्त पिंपळगावचे सरपंच दिगंबर कापरे, तंटामुक्ती अध्यक्ष दादासाहेब शितोळे, लालासो शितोळे, विठ्ठल थोरात, राजेंद्र थोरात, शालेय समिती अध्यक्ष संजय ढमढेरे, मारुती थोरात, तसेच पिंपळगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी जमीन नसल्याकारणाने नोकरी शिवाय पर्याय नव्हता , २० व्या वर्षी आर्मी मध्ये भरती झालो प्रमाणिकपणे नोकरी केली आता सेवानिवृत्तीनंतर नोकरी शिवाय पर्याय नव्हता. म्हणून पुन्हा स्पर्धा परीक्षांचा प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि यश मिळवले.
-महेश ढमढेरे (माजी सैनिक)







