पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर पुढील तीन (Pune Road Diversion) दिवस पर्यटकांना अडचणींचा (Pune News) सामना करावा लागणार आहे. 24 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत किल्ल्यावर जाणारी सर्व वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या काळात सिंहगड घाटमार्गावर रस्त्याचे डांबरीकरण आणि दुरुस्तीची कामे होणार असल्याने महत्त्वाचे मार्ग तात्पुरते बंद राहतील.

पुण्यात जानेवारी 2026 मध्ये पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी विविध देशांमधील सायकलपटू सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या मार्गावर रस्ते सुधारणा, चेंबर दुरुस्ती, पादचारी मार्ग दुरुस्ती आणि इतर सुविधा विकसित करण्यासाठी महापालिकेने 145 कोटी 75 लाख 80 हजार रुपये खर्चाची तरतूद केली आहे. त्यामुळे या मार्गावरील कामांना गती देण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत डोणजे गोळेवाडी टोलनाका ते सिंहगड घाटातील कोंढणपूर टोलनाका तसेच अवसरेवाडी दिशेने जाणारा रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात पर्यटकांना सिंहगड किल्ल्यावर वाहनाने प्रवेश करता येणार नाही. मात्र, आतकरवाडी पायी मार्गाने किल्ल्यावर जाण्याची परवानगी असेल.
वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. पानशेत, खानापूर, डोणजे आणि आतकरवाडी मार्गे सिंहगड घाटमार्गाने खेड-शिवापूरकडे जाणारी वाहतूक डोणजे चौकापासून खडकवासला, किरकटवाडी, नांदेड सिटी आणि वडगाव धायरी मार्गे पुणे-बंगलुरू महामार्गावर वळवण्यात येणार आहे. गोळेवाडी चौक ते सिंहगड पाट या मार्गावर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
प्रशासनाने सांगितले की, सायकल स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी हा बदल आवश्यक आहे. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







