Pune Railway : रेल्वे स्थानकांवर होणारी प्रचंड गर्दी कमी व्हावी, यासाठी उन्हाळी सुट्टी, दिवाळी, छट पूजा अशा गर्दीच्या काळात रेल्वे प्रशासनाकडून प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर मर्यादा घालण्यात येतात. मात्र या निर्णयाचा थेट परिणाम रेल्वेच्या उत्पन्नावर झाल्याचं आता समोर आलं आहे. गेल्या वर्षभरात प्लॅटफॉर्म तिकिटांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात तब्बल १४ टक्क्यांची घट झाली आहे. तरीही प्रवाशांची सुरक्षा अधिक महत्त्वाची मानून रेल्वे प्रशासनाने या उत्पन्नावर पाणी सोडल्याचं चित्र आहे. (Pune Railway)

रेल्वे प्रवास स्वस्त, सुरक्षित आणि सोयीचा असल्यामुळे बहुतांश प्रवासी रेल्वेलाच प्राधान्य देतात. मध्य रेल्वेच्या दृष्टीने पुणे हा अत्यंत महत्त्वाचा विभाग असून, पुणे रेल्वे स्थानक देशातील पहिल्या दहा सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक मानलं जातं. त्यामुळे येथे कायमच मोठी गर्दी असते.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर तिकीट नसताना प्रवेश केल्यास दंड आकारला जातो. त्यामुळे प्रवाशांसोबत आत जाणाऱ्या नातेवाईकांना किंवा ओळखीच्या व्यक्तींना प्लॅटफॉर्म तिकीट घ्यावं लागतं. यामधून रेल्वेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न मिळतं. मात्र गेल्या वर्षापासून प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने आणि गर्दीचं योग्य नियोजन करण्यासाठी गर्दीच्या काळात प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जात आहे.
या निर्णयाचा परिणाम 2025 मध्ये स्पष्टपणे दिसून आला आहे. पुणे रेल्वे विभागाला एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत प्लॅटफॉर्म तिकिटांमधून सुमारे दोन कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत हे उत्पन्न सव्वा दोन कोटी रुपये होतं. म्हणजेच यंदा जवळपास २५ लाख रुपयांची घट नोंदवली गेली आहे.
उन्हाळी सुट्टी, दिवाळी आणि छट पूजेच्या काळात पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ठेवल्याचा हा थेट फटका असल्याचं दिसून येत आहे. मात्र उत्पन्नापेक्षा प्रवाशांची सुरक्षा अधिक महत्त्वाची असल्यामुळे गर्दीच्या वेळी असे निर्णय घेतले जात असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रणात ठेवणं हाच या निर्बंधांचा मुख्य उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितलं.
चौदा स्थानकांवर तिकीटबंदी
पुणे रेल्वे स्थानकासह राज्यातील एकूण १४ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर गर्दीच्या काळात अधूनमधून प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली जाते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुर्गी आणि लातूर या स्थानकांचा समावेश आहे.
मात्र या निर्बंधांमधून काही प्रवाशांना विशेष सूट दिली जाते. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती तसेच ज्या महिला प्रवाशांना एकट्याने प्रवास करता येत नाही, अशांसाठी प्लॅटफॉर्मवर जाण्यास परवानगी दिली जाते, जेणेकरून त्यांचा प्रवास सुलभ होईल.






