पुणे: पुण्यात घरांच्या किमतींमध्ये (Pune News) करोना संकटानंतर सातत्याने वाढ सुरू असून गेल्या वर्षी घरांच्या दरात 11.8 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक वाढ ठरली आहे. सध्या पुण्यात घरांची सरासरी किंमत प्रति चौरस फूट 7367 रुपये इतकी झाली आहे. (Latest Marathi News)

गेरा डेव्हलपमेंट्सने जाहीर केलेल्या पुण्यातील गृहनिर्माण क्षेत्रावरील अहवालानुसार 2025 मध्ये शहरात एकूण 90591 घरांची विक्री झाली आहे. ही विक्री 2024 च्या तुलनेत काहीशी कमी असली तरी घरांच्या किमतीत मात्र मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. करोना काळानंतर पुण्यातील रिअल इस्टेट बाजारात सातत्याने तेजी दिसून येत आहे आणि 2025 मध्ये ही वाढ सर्वाधिक ठरली आहे.
घरांच्या किमती वाढल्या असल्या तरी व्याजदरात झालेल्या कपातीमुळे विक्री स्थिर राहण्यास मदत झाली आहे. पूर्वी गृहकर्जावर 8.75 टक्के व्याजदराने प्रतिलाखासाठी मासिक हप्ता 883 रुपये होता. तो आता 7.5 टक्के दराने प्रतिलाखासाठी 805 रुपये झाला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांसाठी घर खरेदी करणे काहीसे सोपे झाले आहे.
अहवालानुसार गेल्या वर्षी लहान घरांच्या विक्रीत घट झाली असून 1400 चौरस फुटांपेक्षा मोठ्या घरांना अधिक मागणी दिसून आली आहे. परवडणाऱ्या घरांसोबतच आलिशान घरांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन वर्षांनंतर नव्या घरांच्या पुरवठ्यातही वाढ झाली असून 2025 च्या दुसऱ्या सहामाहीत पुरवठ्यात 8 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
2025 मध्ये एकूण 98472 नवीन घरांचा पुरवठा झाला असून विक्रीसाठी उपलब्ध घरांची संख्या 81330 इतकी झाली आहे. गृहनिर्माण बाजारपेठेत किमती वाढत असताना पुरवठाही वाढत असल्याने पुढील काळात मागणी आणि पुरवठ्यात अधिक संतुलन साधण्याची गरज असल्याचे मत गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यातील रिअल इस्टेट बाजारपेठ स्थिर असून घरांच्या किमती आणि नवीन प्रकल्पांमुळे शहरातील गृहनिर्माण क्षेत्राला पुढील काळातही चांगली गती मिळण्याची शक्यता आहे.






