Pune News : पुण्यातील पीएसीएल गुंतवणूक फसवणूक प्रकरणात आरोपी नितीन नारायण थोपटेच्या पोलिस कोठडीची मुदत वाढवण्यात आली आहे. पौड न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सागर मोहिते यांनी थोपटेची कोठडी ३ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा आदेश दिला.

पोलिस तपासात थोपटेने सुस परिसरातील जमीन विक्रीतून तब्बल २७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. गुंतवणूकदारांची रक्कम वापरून घेतलेल्या जमिनीवर निर्बंध असतानाही कोणतीही परवानगी न घेता त्या जमिनीचे तुकडे पाडून सर्वसामान्य लोकांना विक्री केल्याचेही उघड झाले. (Pune News)
आरोपीची पोलिस कोठडी संपत आल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्याचे साथीदार अद्याप फरार आहेत. त्यांना अटक करणे आणि बनावट ठराव व खोटी कागदपत्रे तयार करण्यात कोणी मदत केली हे तपासणे आवश्यक असल्याने कोठडी वाढवावी, अशी मागणी सरकारी पक्षाचे सहाय्यक सरकारी वकील नितीन अडागळे, तसेच गुंतवणूकदार संघटनेच्या वतीने अॅड. निनाद बागमार व अॅड. चेतन फटाले यांनी केली.
सरकारी युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने कोठडी वाढवली. हा स्वतंत्र गुन्हा पोलीस आयुक्त विनय चौबे, उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन घाटे, बारटक्के व सहारे तपासत आहेत.







