पुणे: दौंड तालुक्यातील (Pune News) अनेक गावांमध्ये कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असून शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. बाजारभाव कोसळल्याने उत्पादन खर्चसुद्धा वसूल होत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रति 10 किलो 200 रुपये दराने कांदा खरेदी करावा, अशी ठाम मागणी शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून करीत आहेत.

साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात कांद्याला वाढीव दर मिळतो. मात्र यंदा परिस्थिती उलट झाली. मे-जूनमध्ये कांद्याला 180 ते 200 रुपये दर मिळाला. ऑगस्टमध्ये तो 100 ते 150 रुपयांवर घसरला. तर सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये शंभर रुपयांच्या आत भाव आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांद्याचा उत्पादन खर्च एकरी तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत येतो. एकरी सरासरी 180 गोण्या उत्पादन मिळते.

परंतु सध्याच्या बाजारभावात उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्यात धोरणातील अनिश्चिततेमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. वातावरणातील बदलांमुळे वखारीतील कांद्याला वास येत आहे. कांद्याची निवड करताना मोठ्या प्रमाणात चौरे फुटत आहेत आणि दुय्यम दर्जाचा कांदा तयार होत आहे. बाजारात हा कांदा नेला तर त्याला केवळ 3 रुपये किलो भाव मिळतो.

“सध्या कांद्याला मागणीच नाही. बाहेरील राज्यांत कांदा जात नाही. निर्यातीबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्ट धोरण नाही. दिवाळीच्या तोंडावर भाव वाढतील अशी शेतकरी व व्यापाऱ्यांना अपेक्षा होती, परंतु नवीन कांदा सुरू झाल्याने भावात घट झाली आहे. कांद्याची विक्री मोठ्या शहरांपुरतीच मर्यादित आहे आणि अपेक्षित दर मिळत नाहीत.”
– मनोज संपत निंबाळकर (कांदा आडते, केडगाव)
“शेतकऱ्यांचा जीव वाचवायचा असेल तर शासनाने तातडीने बाजारात हस्तक्षेप योजना राबवून 10 किलोला 200 रुपये दराने कांदा खरेदी करावा आणि अनुदान योजना सुरू करावी. या घटलेल्या भावामुळे स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण होत आहे. लाखो रुपये खर्च करून आधुनिक पद्धतीने कांदा साठवणुकीसाठी वखारी तयार केल्या आहेत, परंतु उत्पादन खर्च आणि बाजारभाव यामध्ये मोठी तफावत आहे. अगदी दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. वातावरणातील बदलामुळे 500 पिशवी साठवलेला कांदा फक्त 100 ते 150 पिशव्या चांगल्या निघत आहेत. त्यामुळे कांदा पिकासाठी हमीभाव आणि अनुदान योजना सुरू करावी.”
-संतोष नानासो थोरात (कांदा उत्पादक शेतकरी, खुटबाव)







