Pune : पुण्यात आज राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याचं यावेळी स्पष्ट झालं. ( Pune)
पत्रकार परिषदेनंतर अजित पवारांनी पुण्यात रोड शो केला. सेवन लव्ह चौकातून या रोड शोला सुरुवात झाली. मात्र, यावेळी घडलेला एक प्रकार सगळ्यांच्याच लक्षात राहिला.
रॅलीदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष करण गायकवाड यांनी अक्षरशः थरारक पद्धतीने अजित पवारांचा सत्कार केला. क्रेनला स्वतः लटकून त्यांनी अजित पवारांना हार घातला आणि महात्मा फुले यांची पगडीही परिधान केली. हा प्रकार पाहून अजित पवार क्षणभर शॉक झाले. पण ओळखीचा चेहरा लक्षात येताच त्यांनीही करण गायकवाडांना सेल्युट करत प्रतिसाद दिला. उपस्थितांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला.
दरम्यान, पुण्यातील चार मतदारसंघांत अजित पवारांनी रोड शो करत ताकद दाखवली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर वर्चस्व टिकवण्यासाठी अजित पवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
याच वेळी अजित पवारांनी पुणेकरांसाठी मोठी घोषणा करत गुड न्यूज दिली. “आज मी नेता म्हणून नाही, तर पुणेकर म्हणून बोलतोय. जिथे आपलेपणा असतो, तिथे कारणं दिली जात नाहीत, जबाबदारी घेतली जाते,” असं म्हणत त्यांनी पुणेकरांसाठी मोफत बस आणि मेट्रो सेवा सुरू करण्याचं आश्वासन दिलं.
पुणेकरांसाठी मोफत मेट्रो आणि बस सेवा सुरू करण्याचा जाहीरनामा त्यांनी जाहीर केला असून, पाच मुद्द्यांवर आधारित आश्वासनं दिली आहेत. या घोषणेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.







