वाघोली: ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे बिगुल वाजले आहे. पुण्याच्या पूर्व हवेलीतील वाघोली येथे 18 ते 22 मार्च दरम्यान ही ऐतिहासिक स्पर्धा पार पडणार आहे. यंदाचे आयोजन केवळ भव्य नसून, “न भूतो न भविष्यती” असे असेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित या 68 व्या पर्वात राज्याच्या 42 जिल्ह्यांतील तब्बल 850 हून अधिक पैलवान स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक तथा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव यांनी दिली

वाघोलीच्या बाजार मैदानात या स्पर्धेसाठी आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असे भव्य क्रीडांगण उभारण्यात आले आहे. या क्रीडानगरीला ‘स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडानगरी’ असे नाव देण्यात आले असून, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नुकतेच याचे नामकरण करण्यात आले. विशेष म्हणजे, वाघोली पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पैलवान आणि समाजसेवकांनी लोकसहभागातून ही मोठी जबाबदारी उचलली आहे.
कुस्तीच्या इतिहासातील सर्वाधिक बक्षिसे यंदा दिली जाणार आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणाऱ्या पैलवानाला मानाच्या गदेसह फॉर्च्युनर कार, तर उपविजेत्याला स्कॉर्पिओ एन ही चारचाकी देण्यात येणार आहे. इतकेच नाही, तर प्रत्येक वजनी गटातील विजेत्याला बुलेट दुचाकी देऊन गौरविण्यात येणार आहे. रामकृष्ण अण्णा सातव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या बक्षिसांची घोषणा करून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला आहे.
वाघोली आणि कुस्तीचे नाते जुने आहे. या भागात आजही आखाड्यांची परंपरा जपली जाते. पंढरीनाथ अण्णा पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा अधिक प्रगल्भ होत आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी प्रत्येक जिल्ह्यातून आणलेल्या मातीचे पूजन करून वास्तू पूजनाचा सोहळा पार पडेल.
महाराष्ट्र केसरी ही केवळ स्पर्धा नसून पैलवानांच्या कष्टाचा सन्मान आहे. 22 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम लढतीला आणि बक्षीस समारंभाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. क्रीडाप्रेमींसाठी राहण्याची आणि भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली असून, शिस्तबद्ध नियोजनासाठी शेकडो तरुण कार्यकर्ते कार्यरत आहेत.
देशभरातील कुस्तीप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन..
पुण्याच्या वाघोलीत 18 ते 22 मार्चदरम्यान 68 व्या ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार रंगणार आहे. राज्यातील 42 जिल्ह्यांतील लाल माती एकत्र करून स्पर्धेचे भूमिपूजन थाटात पार पडले. विजेत्याला आलिशान फॉर्च्युनर, उपविजेत्याला स्कॉर्पिओ, तर गटविजेत्यांना बुलेट मिळणार आहे. कुस्तीची ही गौरवशाली परंपरा जोपासण्यासाठी आणि खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हे भव्य आयोजन महत्त्वाचे आहे. 22 मार्चच्या अंतिम सोहळ्याला कुस्तीप्रेमींनी नक्की हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे संयोजक तथा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव







