उरुळी कांचन, (पुणे): टिळेकरवाडी (ता. हवेली) हद्दीत (Uruli Kanchan News) बिबट्या एका डाळिंबाच्या बागेत मुक्तपणे संचार करताना नागरिकांना दिसला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने अघटीत होण्याची वाट न पाहाता बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिरुर तालुक्यातील जांबुत, पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन बळी गेले आहेत. याची भीती परिसरातील नागरिकांमध्ये खोलवर रुजली आहे. यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

उरुळी कांचन जवळील कोरेगाव मूळ, टिळेकरवाडी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. शुक्रवारी (ता. 06) भरदिवसा टिळेकरवाडी (ता. हवेली) हद्दीतील चूनखडी परिसरात एका डाळींबाच्या बागेत बिबट्या मुक्तसंचार करीत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे टिळेकरवाडीसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. या बिबट्याला वनविभागाने पिंजरा लावून पकडावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोरेगाव मूळ परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना वाढल्या आहेत. शिवारात दिवसभर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्याच्या भीतीने शेतीकाम करावे लागत आहे. आज या शेतात दिसतो, तर उद्या दुसऱ्या शिवारात बिबट्या दिसून येतो अशी ग्रामस्थांची स्थिती झाली आहे.
दरम्यान, शेतवस्तीवरील घराजवळ वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी वारंवार मागणी होत असली तरी वनविभाग मात्र कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये वनविभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळतात. मनुष्यबळ कमी आहे, काय करणार अशी कारणे दिली जातात. कार्यवाहीऐवजी शेतकऱ्यांना पर्याय सांगितले जातात. बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना समोर येत आहेत. वन खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
सचिन कड, (सामाजिक कार्यकर्ते, कोरेगाव मूळ, ता. हवेली)बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याची माहिती हवेलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद रासकर यांना देण्यात आली आहे. त्यानुसार अधिकारी पाहणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी.
विजय टिळेकर, पोलीस पाटील, टिळेकरवाडी. ता. हवेली







