जेजुरी, ता. 24 : पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर येथे घराजवळ खेळत असताना सर्पदंश झाल्याने अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोही बाबूराव चव्हाण असे मृत चिमुकलीचे नाव असून, गुरुवारी (ता. 22) सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे पांडेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोही घराजवळ खेळत होती. त्यावेळी तिला सापाने दंश केला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने तिला जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाही आरोहीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा अशा प्रकारे अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची जेजुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार राऊत पुढील तपास करीत आहेत.








