पुणे : ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी, 26 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील वाहतुकीच्या व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. मिरवणूक ज्या भागातून जाणार आहे, त्या परिसरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जातील, तर काही ठिकाणची वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात येतील. त्यामुळे वाहनचालकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी कोणते रस्ते बंद आहेत ते नक्की जाणून घ्या.

ईद-ए-मिलादची मिरवणूक नानापेठेतील मनुशाह मशीद, 482 नानापेठ येथून सुरू होणार आहे. सुरुवातीला मिरवणूक संत कबीर चौक, ए.डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा आणि पद्मजी पोलीस चौकीमार्गे पुढे जाईल. त्यानंतर निशांत सिनेमा, भगवानदास चाळ, चुडामन तालीम आणि मुफ्ती फौज चौक असा तिचा मार्ग असेल.
पुढील टप्प्यात मिरवणूक सरदार पटेल रोड, कुरेशी मशीद, जान मोहम्मद स्ट्रीट, बाबाजान दर्गा, चारबावडी चौकी, फुलवाला गल्ली आणि सेंटर स्ट्रीट रोडवरून जाईल. त्यानंतर भोपळे चौक, 15 ऑगस्ट चौक आणि एम.जी. रोड ओलांडून महमद रफी चौक, कोहीनूर चौक आणि महावीर चौक गाठला जाईल.

मिरवणूक सेंटर स्ट्रीट पोलीस चौकी चौक, सरबतवाला चौक आणि क्वार्टर गेटमार्गे पुन्हा संत कबीर चौकाकडे जाईल. पुढे नाना चावडी चौक, अल्पना सिनेमा, हमजेखान चौक आणि गोविंद हलवाई चौकातून सुभानशाह दर्गा चौक गाठण्यात येईल. अखेर शुक्रवार पेठेतील सिटी जामा मशीद येथे मिरवणुकीची सांगता होईल.
मिरवणुकीमुळे रास्ता पेठ पॉवर हाऊस ते संत कबीर चौक या रस्त्यावर वाहतुकीला निर्बंध असतील. या मार्गावरील वाहने समर्थ पोलीस स्टेशन आणि क्वार्टर गेटच्या दिशेने वळवली जातील. क्वार्टर गेटहून येणाऱ्या वाहनांसाठी सायकल कॉलनी, समर्थ पोलीस स्टेशन, रास्ता पेठ, पॉवर हाऊस, के.ई.एम. हॉस्पिटल आणि अपोलो सिनेमा असा पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे.
नाना पेठेतून लक्ष्मी रोडकडे जाणाऱ्या वाहनांना नाना चावडी चौकातून रास्ता पेठ-पॉवर हाऊसच्या दिशेने पाठवण्यात येईल. तसेच पद्मजी चौकी ते ए.डी. कॅम्प चौक या मार्गावरील वाहतूक क्वार्टर गेट आणि जुना मोटार स्टँडकडे वळवण्यात येणार आहे.
कॅम्प वाय जंक्शनवरून एम.जी. रोडकडे जाणाऱ्या वाहनांना खाणे मारुती चौकाचा मार्ग दिला जाईल. इस्कॉन मंदिर चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि अरोरा टॉवरच्या दिशेने जाणारी वाहतूक परिस्थितीनुसार सकाळी 9 वाजल्यानंतर थांबवली जाऊ शकते.
मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मशीदकडे जाणारी वाहने चुडामन तालीममार्गे वळवली जातील. व्होल्गा चौकातून महमद रफी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना ईस्ट स्ट्रीट रोडमार्गे इंदिरा गांधी चौकाचा पर्याय दिला जाईल. महावीर चौकातून सरबतवाला चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एम.जी. रोडमार्गे नाझ चौकाचा मार्ग उपलब्ध असेल.
मिरवणुकीच्या मार्गावर तसेच जोडरस्त्यांच्या प्रवेशाजवळ 100 मीटरच्या परिसरात वाहन उभे करण्यास मनाई असेल. वाहतूक कोंडी आणि गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी मिरवणुकीचा मार्ग शक्यतो टाळावा आणि उपलब्ध पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.







