पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात सामाईक शेतबांधाच्या वादातून दोन शेतकरी कुटुंबांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या असून यवत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही घटना 1 जून 2026 रोजी सकाळी पाटस गाव परिसरात घडली. शरद दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतालगत असलेल्या अरविंद निंबाळकर यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी सुरू होती. त्यावेळी सामाईक बांध फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत विचारणा केल्यानंतर वाद झाला. या वादातून अरविंद निंबाळकर यांनी ऊसतोडणीच्या कोयत्याने हल्ला करून त्यांच्या डाव्या हाताला जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात अरविंद निंबाळकर आणि त्यांची पत्नी मंगल निंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे, अरविंद श्रीरंग निंबाळकर यांनीही यवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते त्यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना शेजारील शेतकरी लक्ष्मण चव्हाण आणि शरद चव्हाण यांच्यासोबत वाद झाला. यावेळी शरद चव्हाण यांनी लोखंडी अँगलने हल्ला केल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाल्याचा आरोप आहे. तसेच नंतर घटनास्थळी आलेल्या आंबादास चव्हाण आणि सुरज चव्हाण यांनी दगडफेक करून त्यांना मारहाण केली व ट्रॅक्टरचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेत दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले असून त्यांनी उपचार घेतल्यानंतर पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. सामाईक बांधाच्या वादातून सुरू झालेला हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याने परिसरात चर्चा सुरू आहे. यवत पोलीस दोन्ही गुन्ह्यांचा तपास करत असून नेमकी घटना काय घडली याचा शोध घेत आहेत.








