दौंड, (पुणे) : लिंगाळी (ता. दौंड) येथील कालिका नगर परिसरात अज्ञात चोरट्याने पाण्याची मोटार आणि स्टार्टर चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत एकूण 17 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. बुधवारी (ता. 16) रात्री साडेनऊ ते 17 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. सावन कुमार राजभर (वय 31, रा. मीरा सोसायटी रोड, दौंड) यांच्या जागेत ही चोरी झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. 16) रात्री साडेनऊ ते 17 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने सावन कुमार राजभर यांच्या जागेत प्रवेश करून टेक्समो कंपनीची दीड एचपीची पाण्यातील मोटार, तसेच युनिक कंपनीचा स्टार्टर चोरून नेला. चोरीला गेलेल्या मोटारीची अंदाजे किंमत 15 हजार रुपये, तर स्टार्टरची किंमत दोन हजार रुपये आहे. सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर राजभर यांनी दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार निकम करीत आहेत.







