उरुळी कांचन, (पुणे) : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या परतीच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम बुधवारी (ता. 05) कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे आहे. या पार्श्वभूमीवर हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी कुंजीरवाडी येथील पालखीतळ आणि श्री विठ्ठल मंदिरातील व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला.

मात्र, पाहणीदरम्यान शासनाकडून परतीच्या पालखीसाठी एक रुपयाचाही निधी किंवा अनुदान न मिळाल्याची वस्तुस्थिती समोर आल्याने, ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या दुटप्पी धोरणावर संताप आणि खंत व्यक्त केली आहे.

कुंजीरवाडी येथे परतीच्या पालखीसोबत सुमारे 2 ते 3 हजार वारकरी बांधव मुक्कामी असतात. तसेच या प्रसंगी दर्शनासाठी पंचक्रोशीतील तब्बल 6 ते 7 हजार भाविक-भक्त मोठ्या संख्येने येतात. या सर्व वारकरी व भाविकांसाठी कुंजीरवाडी ग्रामस्थांनी स्वतःच्या खिशाला कात्री लावून, लोकवर्गणीतून भव्य मंडप, पिण्याचे पाणी आणि महाप्रसादाची कडक व्यवस्था उभारली आहे. इतकेच नव्हे तर, कुंजीरवाडीसह परिसरातील नागरिकांनी प्रत्येक घरोघरी जाऊन वारकऱ्यांसाठी प्रेमाने ‘घरच्या भाकरीची’ सोय केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

पाहणी दरम्यान ग्रामस्थांनी सभापतींसमोर प्रशासनाचा कारभार उघडा पाडला. “पालखी पंढरपूरला जाताना शासन कोट्यवधी रुपयांचा निधी आणि सोयी-सुविधा पुरवते, मग परतीच्या प्रवासात वारकऱ्यांवर ही दुरवस्था का? परतीच्या मुक्कामासाठी अद्याप शासनाकडून एक रुपयाचेही अनुदान का मिळाले नाही?” असा सवाल ग्रामस्थांनी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, याबाबात बोलताना हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे म्हणाले की, “पालखी पंढरपूरला जाताना ज्याप्रमाणे गावांसाठी व पालखीतळासाठी मोठा निधी उपलब्ध केला जातो, त्याच धर्तीवर परतीच्या पालखी मुक्कामाच्या सर्वच स्थळांना व कुंजीरवाडी गावालाही विकास निधी मिळालाच पाहिजे. कुंजीरवाडीसह इतर परतीच्या मुक्काम स्थळांच्या सुधारणेसाठी आणि निधी मंजुरीसाठी मी स्वतः जिल्हा परिषद व शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे.”






