पुणे: पुण्यातील चऱ्होली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालयातील तलाठी आणि एका खाजगी व्यक्तीला 70,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. वारस नोंदणीच्या कामासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) सुनील भिकाजी सातोसे आणि खाजगी व्यक्ती नेमाजी माधवराव भोकरे यांचा समावेश आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदाराच्या आजोबांच्या निधनानंतर संबंधित शेतजमिनीवर त्यांच्या वडिलांची आणि काकांची वारस नोंद करण्यासाठी डिसेंबर 2025 मध्ये महसूल कार्यालयात अर्ज करण्यात आला होता. मात्र अनेकदा पाठपुरावा करूनही वारस नोंद करण्यात आली नव्हती.
तक्रारदार 29 मे 2026 रोजी पुन्हा चौकशीसाठी कार्यालयात गेले असता तलाठी सुनील सातोसे यांनी काम करून देण्यासाठी सुरुवातीला 1,80,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. नंतर तडजोडीअंती ही रक्कम 80,000 रुपयांवर आणण्यात आली. यानंतर तक्रारदाराने 1 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी 4 जून रोजी करण्यात आली. या कारवाईदरम्यान तलाठी सातोसे यांनी पुन्हा 80,000 रुपयांची मागणी केली. पुढील चर्चेनंतर 70,000 रुपयांमध्ये व्यवहार ठरला. ही रक्कम स्वतःकडे न घेता खाजगी व्यक्ती नेमाजी भोकरे यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले.
त्यानुसार 8 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. चऱ्होली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालयात तक्रारदाराकडून 70,000 रुपयांची लाच स्वीकारताना नेमाजी भोकरे यांना पकडण्यात आले. चौकशीत ही रक्कम तलाठी सुनील सातोसे यांच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.
पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून सहायक पोलीस आयुक्त निता मिसाळ पुढील तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस उप आयुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिरीष सरदेशपांडे आणि अजित पाटील यांनी केले आहे.







