आझमगड : उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील शंभुपूर गावात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. अहरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि 2 पुजाऱ्यांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने आपल्या 3 मुलांना घरात बंद करून ठेवले. तब्बल 7 तास पोलिसांसमोर हा थरार सुरू होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव अरविंद सिंग असे आहे. त्याच्या भावाची सुमारे 8 वर्षांपूर्वी हत्या झाली होती. त्यानंतर भावाचा आत्मा कुटुंबाला त्रास देत असल्याचा संशय घरातील काही लोकांना होता. या समजुतीतून गेल्या काही दिवसांपासून अरविंदच्या घरी धार्मिक विधी आणि पूजा सुरू होती. त्यासाठी काही पुजाऱ्यांना बोलावण्यात आले होते.

पूजा सुरू असताना अरविंद अचानक संतापला आणि त्याने विधी थांबवण्यास सांगितले. मात्र, ब्राह्मणांनी पूजा सुरु ठेवली.. ज्या मुले अरविंद संतापला, पूजा सुरू राहिल्याने त्याचा राग वाढला. त्याने स्वतःकडील परवानाधारक पिस्तूल काढून गोळीबार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात 2 पुजाऱ्यांचा मृत्यू झाला, तर आणखी काही जण घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगण्यात येते.

यानंतर अरविंदने पत्नीवरही गोळी झाडली. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने आपल्या 8 वर्षांच्या मुलगा शौर्य, 12 वर्षांची मुलगी परी आणि 6 महिन्यांच्या बाळाला घरात ओलीस ठेवले.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सुमारे 7 तास आरोपीशी संवाद साधून मुलांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने पोलिसांवरही गोळीबार केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर एटीएस आणि एसओजीचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, आरोपीने एका मुलावरही गोळी झाडल्याची माहिती आहे. मुलांचा जीव धोक्यात असल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात अरविंद जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.






