पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास आता अतिशय महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची ७ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांनान्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने या दोघांना ३ जुलै २०२६ पर्यंत आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील गुंतागुंत पाहता, तपास यंत्रणांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याचीही २ दिवस सखोल चौकशी केली आहे.

या चौकशीदरम्यान साहिल गोयल याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. साहिलच्या म्हणण्यानुसार, सिया आणि चेतन यांच्या नात्याबद्दल ती स्वतः संभ्रमात होती. “सिया मला म्हणाली होती की आम्ही फक्त मित्र आहोत, पण सोबत असताना आम्हाला आनंदी वाटते. मात्र, आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत असे तिने कधीही स्पष्टपणे सांगितले नव्हते,” असे साहिलने पोलिसांना सांगितले.

साहिलने पुढे अशी माहिती दिली की, त्याने सियाला नेहमीच समजावण्याचा प्रयत्न केला होता. “तू अजून खूप लहान आहेस आणि बऱ्याचदा या वयात मैत्रीलाच लोक प्रेम समजून मोठी चूक करतात,” असे मी तिला वारंवार सांगितले होते. साहिलचा असा दावा आहे की, जर सियाने कुटुंबाला विश्वासात घेऊन चेतनसोबतच्या नात्याबद्दल स्पष्ट कल्पना दिली असती, तर त्यांनी तिचा केतनसोबतचा साखरपुडा तातडीने मोडला असता. ही माहिती केवळ माझ्या आणि सियाच्या दरम्यान होती आणि मी ती कोणालाही सांगितली नव्हती, असेही साहिलने स्पष्ट केले. सध्या पुणे ग्रामीण पोलीस डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे अधिक तपास करत आहेत.







