दुबई : हवेत उंचीवर असताना विमानाचा ताबा घेऊन ते क्रॅश करण्याचा कथित प्रयत्न वैमानिक कॅप्टन स्मित मछार यांनी उधळून लावला आहे. दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या ‘फ्लाय दुबई’च्या विमानात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत 180 प्रवासी होते. भारतीय वंशाचे मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मछार यांनी गंभीर जखमी अवस्थेतही दाखवलेल्या धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटना घडली तेव्हा 6 वर्षांची नीना मानेस हिला टॉयलेटला जायचे होते. ती आई ताली मानेससोबत कॉकपिटजवळील टॉयलेटकडे जात होती. त्याचवेळी कॉकपिटचा दरवाजा काहीसा उघडला आणि ताली यांनी आत धक्कादायक दृश्य पाहिल्याचा दावा आहे. ओमानी सह वैमानिक कॅप्टन मछार यांच्यावर चाकूने हल्ला करत असल्याचे त्यांना दिसले.

हा प्रकार पाहून ताली यांनी आरडाओरड केली. त्यानंतर विमानातील काही प्रवासी कॉकपिटकडे धावले. कॅप्टन मछार गंभीर जखमी होऊन खाली कोसळले होते. मात्र, अशा अवस्थेतही त्यांनी कॉकपिटमधील इमर्जेंसी रिलीज लॉक दाबून दरवाजा उघडला. त्यामुळे बाहेरील प्रवाशांना आत प्रवेश करून मदत करता आली.

प्रवाशांनी तत्काळ सह वैमानिकाला ताब्यात घेतले. यानिव हयून नावाच्या प्रवाशाने त्याला मागून पकडून कॉकपिटबाहेर आणल्याचे सांगितले जाते. विमानातील एका डेंटिस्टने जखमी कॅप्टनवर प्राथमिक उपचार करून रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, विमानातील ऑफ-ड्युटी वैमानिकांनी नियंत्रण हाती घेतले. एटीसीशी संपर्क साधल्यानंतर विमानाचे सौदी अरेबियातील तबुक येथे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. कॅप्टन मछार यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. विमानातील सर्व 180 प्रवासी सुरक्षित आहेत.
इज्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या घटनेबाबत गंभीर प्रतिक्रिया दिली. प्राथमिक तपासाच्या आधारे हा हल्ला जिहादी कट्टरतेशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, इज्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांनी कॅप्टनला वाचवण्यासाठी मदत करणाऱ्या यानिव हयून, ज्विका मानेस आणि असाफ राजुआन यांना ‘Presidential Award for Civilian Heroism’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे.







