पुणे: पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका विवाहित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे. महिलेने आपल्या पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात फसवणूक आणि मानसिक त्रास दिल्याचे आरोप केले आहेत. लग्नापूर्वी पतीबाबतची काही महत्त्वाची माहिती आपल्यापासून लपवण्यात आल्याचा दावा तिने तक्रारीत केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 44 वर्षीय महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित महिलेचा विवाह 2006 मध्ये झाला होता. मात्र, विवाहापूर्वी पतीच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही बाबी तिच्यापासून लपवण्यात आल्याचे तिने म्हटले आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर काही काळाने पतीच्या वागण्यात बदल जाणवू लागला. तिचा पती समलैंगिक (gay) असून त्याचे अन्य पुरुषांसोबत अनैतिक संबंध सुरू असल्याचा दावा या महिलेने केला आहे. विशेष म्हणजे, लग्नापूर्वी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट पतीसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाने जाणीवपूर्वक लपवून ठेवली आणि सत्य लपवून आपले लग्न लावून दिले, असा आरोपही पीडितेने केला आहे. या प्रकारामुळे आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले आहे.

तक्रारीमध्ये महिलेने पतीसोबतच सासू, सासरे, दीर आणि जाऊ यांच्यावरही आरोप केले आहेत. सासरच्या मंडळींकडून आपल्याला त्रास देण्यात आला तसेच मानसिक दबाव निर्माण करण्यात आल्याचा दावा तिने केला आहे.
महिलेने अनेक वर्षे परिस्थिती सहन केल्यानंतर अखेर पोलिसांकडे धाव घेतली. आपल्यासोबत अन्याय झाल्याचे सांगत तिने संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या तक्रारीच्या आधारे भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक आणि छळाच्या आरोपांबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. तक्रारीतील सर्व आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात असून, तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.






