शिरूर: पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात शुक्रवारी सकाळी गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. लाटेआळी येथील आंबेडकर नगर परिसरात सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव हरी गंगावणे असे आहे. सकाळच्या वेळी अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हरी गंगावणे गंभीर अवस्थेत आढळून आले. मात्र, गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, ही हत्या पूर्वीच्या वादातून झाला आहे का किंवा त्यामागे अन्य काही कारण आहे का, याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू करण्यात आला आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील उपलब्ध माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे तपास सुरु आहे.







