योगेश शेंडगे
शिरुर : शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत रामलिंग परीसरात अवैध्यरीत्या तीस हजार आठशे रुपयांचा गुटखा वाहतुक करताना सचिन अंकुश कु-हाडे हा इसम गाडीसह मिळून आल्याने त्याच्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना प्राप्त झालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे शिरूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील हद्दीत रामलींग येथील शिक्षक कॉलनी ता. शिरूर येथे आरोपी सचिन अंकुश कु-हाडे (रा. पाबळफाटा, शिरूर) हा विना परवाना प्रतिबंधित असा आरएमडी कंपनीचा गुटखा, एम कंपनीची तंबाखु, विमल कंपनीचा गुटखा व व्ही १ कंपनीची तंबाखू असा माल वाहतुक करत असल्याची बातमी मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने, रामलिंग येथील शिक्षक कॉलनी येथे पो. हवा. भवर, पो.हवा. परशुराम सांगळे व पो.हवा. नितिन सुद्रिक यांनी छापा टाकला असता एकुण ३० हजार ८०० रुपये किमतीचा प्रतिबंधित माल त्याच्या ताब्यातील ४ लाख रुपये किंमतीची टोयाटो कंपनीच्या इटीऑस कार नं. एम.एच ०४ एफ.आर १०७१ मध्ये विनापरवाना वाहतुक करीत असताना मिळुन आला. त्यावेळी आरोपी सचिन अकुश कु-हाडे ( वय ३० वर्षे, रा. पाबळफाटा, शिरूर) याच्याविरुध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई पो.हवा. भवर, पो.हवा. परशुराम सांगळे, पो.हवा. नितिन सुद्रिक यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि .हनुमंत गिरी हे करीत आहेत.