अक्षय टेमगिरे

शिरूर : शिरूर (Shirur Crime) तालुक्यातील चिंचणी गावात घरगुती वादातून जावयाला त्याचे सासरे, सासू व पत्नी यांनी मिळून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात (Shirur Police Station) तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शशिकांत चंद्रकांत जगताप (वय 41, व्यवसाय मजुरी, रा. चिंचणी ता. शिरूर जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरे नाना गणपत घोडके, सासू पदम नाना घोडके (दोघे रा. चांडगाव ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) व पत्नी पुनम शशिकांत जगताप (रा. चिंचणी, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शशिकांत जगताप यांची पत्नी पुनम हिच्याशी शाब्दिक वाद झाला. या वादातून सासरे नाना घोडके, सासू पदम घोडके व पत्नी पुनम यांनी संगनमत करून शशिकांत यांच्यावर हल्ला केला. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, सासऱ्यांनी गॅसच्या पाईपाने पाठीत व हातावर मारहाण केली, तर सासू व पत्नी यांनी डोळ्यांत मिरची पावडर टाकून त्यांना तसेच त्यांच्या वडिलांना चंद्रकांत जगताप, आई सुनिता जगताप आणि मुलगी अमिताला दगडफेक करून, हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपींनी फिर्यादीस “जिवे मारून टाकू” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर फिर्यादीने शिरूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असुन शिरूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासास सुरुवात केली आहे.
या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोरे हे करत आहेत.






