बारामती: बारामती येथील ‘सहयोग’ या निवासस्थानी (Sharad Pawar) आजही राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी राज्याचे लोकप्रिय (Ajit Pawar Death) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली (Parth Pawar) अर्पण केली. दादांवरील जनतेचे प्रेम आणि भावनिक नाते आजही तितक्याच तीव्रतेने दिसून येत असून, सलग तिसऱ्या दिवशी शरद पवार यांनी सहयोग बंगल्यावर उपस्थित राहून लोकांचे अभिवादन स्वीकारले.

या वेळी शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार उपस्थित होते. तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांनी शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेत रोहित पवारही सहभागी होते. ही चर्चा केवळ कौटुंबिक नव्हे, तर सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे बारामतीतील वातावरण अधिकच लक्षवेधी ठरले आहे. दादा गटातील नेत्यांकडून एकत्रीकरणाच्या चर्चांना फेटाळले जात असताना, तसेच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता धूसर झाली होती. मात्र शरद पवार यांनी बारामतीत तळ ठोकत पवार कुटुंबातील सदस्यांशी सातत्याने संवाद साधल्यामुळे, एकत्रीकरणाच्या चर्चांना नव्याने बळ मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शरद पवार यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात आली असतानाच अजित पवार यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या माघारी तरी एकत्रीकरण व्हावे, अशी आमची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसारच सध्या कुटुंबीयांशी आणि नेत्यांशी संवाद सुरू असल्याचे बोलले जाते.
दरम्यान, सहयोग निवासस्थानी पार्थ पवार यांची भेट घेण्यासाठीही मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पार्थ पवार यांनी प्रत्येकाशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि पुढील वाटचालीबाबत विचारांची देवाणघेवाण केली. बारामतीतील हे दृश्य केवळ श्रद्धांजलीपुरते मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील दिशा सूचित करणारे ठरत आहे.







