पुणे : पुण्यातील एस .एम .जोशी पूल परिसरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याच्या मुख्य मागणीसाठी हे परीक्षार्थी रस्त्यावर उतरले आहेत.वाढता पाठिंबा आणि गर्दी लक्षात घेता पुणे पोलिसांनी या आंदोलनाबाबत कडक भूमिका घेतली आहे.

पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत विद्यार्थ्यांना दिलेल्या ठिकाणी आंदोलन करण्याची सुधारित परवानगी नाकारली आहे. तसेच, प्रशासनाने तातडीने नोटीस बजावून एस एम जोशी पूल परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस प्रशासनाची कारवाई आणि परवानगी नाकारल्यानंतरही विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे या परिसरातील वातावरण तापले असून, आगामी काळात पोलीस प्रशासन कोणती पावले उचलणार आणि या संघर्षावर काय तोडगा निघणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

जोपर्यंत अध्यक्षांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळत असून विरोधकांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठबळ दिले आहे.

नुकतेच 7 ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आणि आगामी काळात या मुद्द्यावर तीव्र संघर्ष उभारण्याचा इशारा दिला आहे.







