पुणे : पुणे शहर पोलीस दल आणि ‘विघ्नहर्ता न्यास’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक तसेच कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित विविध उपक्रमांसाठी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बापू काळभोर यांची परिमंडळ ६च्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात झालेल्या बैठकीत विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त डॉ. शंतनू जगदाळे यांनी या नियुक्तीची घोषणा केली.

‘विघ्नहर्ता न्यास’ हे पुणे शहर पोलीस दलाच्या सहकार्याने सामाजिक सलोखा, नागरिकांशी सुसंवाद आणि सुरक्षिततेसाठी काम करणारे व्यासपीठ आहे. या न्यासाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुणे पोलीस आयुक्तांकडे असून, परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त सचिव म्हणून काम पाहतात.

गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने परिमंडळ ६मधील गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी, महिला दक्षता समिती, शांतता समिती, विघ्नहर्ता न्यासाचे सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींचे अधिकारी तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गणेशोत्सवाच्या काळातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, अतुलकुमार नवगीरे, लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, हडपसरचे हेमंत पाटील, काळेपडळच्या गिरीषा निंबाळकर, मांजरीचे बाबासाहेब निकम, मुंढव्याच्या स्मिता वासनिक, नगरसेवक मारुती आबा तुपे, विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त डॉ. शंतनू जगदाळे आणि समन्वयक सलीम शेख यांच्यासह पोलीस व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात तसेच वर्षभर गणेश मंडळांकडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, आरोग्यविषयक, पर्यावरणपूरक आणि शैक्षणिक उपक्रमांची दखल घेऊन विघ्नहर्ता न्यासाकडून दरवर्षी विशेष पुरस्कार देऊन मंडळांचा गौरव केला जातो. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीत वैद्यकीय मदत केंद्रे उभारणे, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, हरवलेल्या मुलांचा शोध घेणे आणि पोलीस प्रशासन व नागरिकांमध्ये सुसंवाद वाढविण्यासाठीही न्यासाकडून विविध उपक्रम राबविले जातात.
परिमंडळ ६च्या हद्दीत हडपसर, मुंढवा, मांजरी, लोणी काळभोर, काळेपडळ आणि फुरसुंगी या पोलीस ठाण्यांचा समावेश होतो. या परिसरातील गणेश मंडळे, सामाजिक संस्था आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी राजेंद्र बापू काळभोर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पत्रकारितेतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि सामाजिक क्षेत्रातील संपर्क लक्षात घेता, या नियुक्तीमुळे पोलीस आणि नागरिकांमधील सुसंवाद अधिक वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.






