नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या राजकारणात आगामी काळात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तृणमूल काँग्रेसशी संबंधित असलेल्या बंडखोर खासदारांच्या गटातील तब्बल 17 खासदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा कूचबिहारचे खासदार जगदीश चंद्र वर्मा बसुनिया यांनी केला आहे. दुर्गापूजेच्या आधी किंवा त्यानंतर हा पक्षप्रवेश होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

या खासदारांनी एकत्रितपणे पक्ष बदलल्यास पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदी त्यांच्यावर लागू होणार नाहीत, असा दावा बसुनिया यांनी केला. त्यामुळे या संभाव्य पक्षांतरामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

14 जून रोजी TMC मधील 20 बंडखोर खासदारांनी ‘नॅशनल सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर या गटाने NDA सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. आता यातील बहुतांश खासदार भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

पक्षांतरबंदीच्या नियमांनुसार, एखाद्या पक्षातील किमान दोन-तृतीयांश सदस्यांनी एकत्रितपणे वेगळा गट स्वीकारल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई टाळता येते. NCPI मधील 20 खासदारांपैकी 17 जण भाजपमध्ये जाणार असल्याने आवश्यक संख्येपेक्षा हा आकडा अधिक असल्याचे बसुनिया यांनी सांगितले.
दरम्यान, सर्व खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांच्यासह अबू ताहेर खान आणि खलीलुर रहमान हे 3 खासदार भाजपमध्ये औपचारिक प्रवेश न करता NDA ला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे सांगितले जात आहे.
या संभाव्य पक्षबदलामुळे बंगालमध्ये आगामी काळात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, या दाव्यावर आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






