आदित्य बोराटे

इंदापूर: गावठी पिस्तुल जवळ बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला भिगवण पोलिसांनी अटक केली. सौरभ मारुती पवार (वय २८, रा. म्हसोबाचीवाडी, ता. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतूस आणि गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ असा एकूण ५ लाख ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मौजे निरगुडे (ता. इंदापूर) येथील गावच्या हद्दीतील जमीन गट क्रमांक १३७ मध्ये हा प्रकार घडला. या ठिकाणी सौरभ पवार हा स्कॉर्पिओमधून तेथे आला होता. त्याच्याकडे गावठी पिस्तुल असल्याचे सांगत फिर्यादी युवराज प्रतापराव भोसले यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली.

या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी तपास पथकाला संशयिताचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयिताचा शोध घेतला.
१० ऑगस्ट रोजी पोलिसांनी सौरभ पवार याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ४० हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ शेंडगे करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील, विठ्ठल वारगड,पोलिस अंमलदार महेश उगले, सचिन पवार, रणजित मुळीक यांच्या पथकाने कारवाई केली.या गुन्ह्याचा पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक सोमनाथ शेंडगे करीत आहेत.







