पुणे: आषाढी वारी सोहळ्यानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज आळंदीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. या पवित्र वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पुण्यात आणि आळंदीत एकत्र आले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारकऱ्यांचे हाल होत आहेत. प्रशासनाने वारकऱ्यांना आळंदीऐवजी पुण्यात मुक्काम करण्याचे आवाहन केले होते, परंतु पुणे महानगरपालिकेने केलेल्या नियोजनाचे दावे आता फोल ठरताना दिसत आहेत.

पुणे महापालिकेच्या 101 शाळांमध्ये वारकऱ्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यात आली होती, त्यासाठी या शाळांना 1 आठवड्याची सुट्टीही देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात अनेक शाळांच्या खोल्यांमध्ये पावसाचे पाणी गळत आहे आणि वर्गखोल्यांमध्ये पाणी साचल्याने वारकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि अस्वच्छतेमुळे अनेक वारकऱ्यांनी शाळांकडे पाठ फिरवत रस्त्यांच्या कडेला राहुट्या उभारत आहेत.

दुसरीकडे, आळंदीमध्ये मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांच्या पालख्यांचे ट्रक पाण्यात अडकले आहेत. महिनाभराचे अन्नधान्य, गॅस सिलेंडर आणि स्वयंपाकाचे साहित्य खराब झाल्याने या वारकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. हिंगोली जिल्हा प्रशासनाने आळंदी प्रशासनाशी समन्वय साधून तातडीने मदत करावी, अशी मागणी वारकऱ्यांकडून केली जात आहे.
या सर्व नैसर्गिक संकटामुळे पुण्यातही परिस्थिती गंभीर आहे. पावसामुळे वारकऱ्यांचे हाल आणि नदीकाठच्या वस्त्यांमधील पूरपरिस्थिती यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासन या परिस्थितीतून कशी सावरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






