पिंपरी: आळंदी-मरकळ रस्त्यावरील धानोरे परिसरातील एका कंपनीत काम करताना उंचावरून खाली पडल्याने 23 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत त्याच्यासोबत काम करणारा 29 वर्षीय कामगार गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (4 सप्टेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास ‘कांगारू पॉलिमर्स मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कन्स्ट्रक्शन केमिकल्स’ या कंपनीत ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या आवारातील उंच लोखंडी कात्रीवर वेल्डिंगचे काम सुरू होते. हे काम उंच ठिकाणी असल्याने कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र, काम करताना हेल्मेट, सेफ्टी हार्नेस किंवा अन्य आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक दोन्ही कामगारांचा तोल गेला. अंकितकुमार रामउजागिर वर्मा (वय 23) आणि शाहीद इस्तियाक खान (वय 29) हे दोघेही उंचावरून थेट खाली पडले. या अपघातात अंकितकुमार याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, तर शाहीद खान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मृत अंकितकुमारचा भाऊ सुखराज वर्मा (वय 20, रा. चिंबळी फाटा, खेड) यांनी आळंदी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संदीप सतीश सिंगल (रा. भोसरी) आणि अलतमश इस्तियाक खान (वय 29, रा. चऱ्होली खुर्द) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.






