Pune Police: पुणे, ता. 25 :पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्तव्यदक्ष व निर्भीड अधिकारी म्हणून ओळख असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (26 जानेवारी 2026) “उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक” जाहीर झाल्याने पोलीस दलासह सर्वसामान्य नागरिकांतून समाधान व अभिमान व्यक्त होत आहे.
शिळीमकर यांनी मागील 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकालात मुंबई शहर, सातारा, नागपूर शहर गुन्हे शाखा, अहिल्यानगर विशेष शाखा तसेच पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना अनेक गंभीर व संवेदनशील गुन्ह्यांचा छडा लावत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना उरुळी कांचन परिसरातील कुख्यात आप्पा लोंढे टोळीला जेरबंद करून त्यांनी परिसरातील गुन्हेगारीवर प्रभावी आळा घातला.

नागपूर शहरात कार्यरत असताना राजा गौस ऊर्फ गौस अली याच्या कुख्यात टोळीचा पर्दाफाश करत खून, दरोडा, खंडणीसह तब्बल 38 गुन्हे उघडकीस आणले. त्याचप्रमाणे संतोष आंबेकर या दहशतवादी गुन्हेगाराच्या टोळीविरोधात ठोस कारवाई करून नागपूर शहरात शांतता प्रस्थापित करण्यात त्यांनी निर्णायक भूमिका बजावली.
अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जनावरांची व शेतीमालाची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा स्वतः फिल्डवर उतरून छडा लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरित मजूर, सामान्य नागरिक तसेच पोलीस बांधवांसाठी आरोग्य, उपचार व उपजीविकेसाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या.
नोव्हेंबर 2022 पासून पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी दरोडे, जबरी चोरी, खून, आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळ्या, ईव्हीएम चोरी, सामूहिक हत्याकांड, मोक्का व एमपीडीए कारवाया यामध्ये उल्लेखनीय यश मिळवले. 58 अवैध अग्निशस्त्रे, अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करून गुन्हेगारीला ठोस आळा घालण्यात आला.
शिस्तप्रिय, प्रामाणिक व जनतेशी सुसंवाद साधणारे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या अविनाश शिळीमकर यांना यापूर्वी 2024 मध्ये पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते. आता राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली असून, पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.






