पुणे: येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात (Pune News) घरातील पाण्याच्या टाकीचा पाईप काढण्यासाठी एका प्लास्टिकच्या खुर्चीचा आधार घेणाऱ्या ४२ वर्षीय अंजुम इस्माइल कुरेशी यांचा तोल जाऊन मृत्यू झाला. येरवड्यातील ‘कुमार पर्णकुटी’ सोसायटीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली.

समोर आलेल्या माहितीनुसार, अंजुम मंगळवारी सकाळी यांनी उंचीवर असलेल्या टाकीपर्यंत पोहोचण्यासाठी स्वयंपाकघरातील ओट्याजवळ एक खुर्ची घेतली. त्यावर उभ्या राहून काम करत असतानाच अचानक खुर्ची सरकली.
अंजुम यांचा तोल गेल्यावर त्या थेट किचन ओट्याच्या कडेवर जोरात आदळल्या. हा मार इतका भीषण होता की, त्यांच्या मानेला गंभीर इजा झाली. याच वेळी त्यांची मुलगी दुसऱ्या खोलीत होती. आई पडल्याचा आवाज ऐकताच ती धावत स्वयंपाकघरात आली, पण समोर आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून ती सुन्न झाली. दरम्यान, त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हा अपघात वाटत असला तरी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.







