सागर जगदाळे

भिगवण: आज बुधवारी (दि.12) रोजी पहाटेच्या सुमारास सोलापूर-पुणे (Pune News) लेन, पळसदेव-काळेवाडी दरम्यान, चहा पिण्यासाठी उभ्या असलेल्या एका लक्झरी बसला दुसऱ्या लक्झरी बसने धडक दिली. या अपघातात 23 महिला किरकोळ जखमी झाल्या, परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
अपघातस्थळी स्थानिकांनी तात्काळ वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची माहिती रात्रगस्ती करत असलेल्या भिगवण पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिस तातडीने अपघातस्थळी दाखल झाले होते.
बस चालकाने अचानक गाडीवरील नियंत्रण गमावल्यामुळे ती समोरच्या बसला जाऊन धडकली. धडकेमुळे दोन्ही बसचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी, रस्त्यावर वाहतूक अडथळा (Traffic Jam) काही प्रमाणात निर्माण झाला होता. अपघातस्थळी त्वरित ॲम्बुलन्स सर्विस पाठवून सर्व जखमींना वेळेत उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये 20 ते 60 वर्षांपर्यंतच्या विविध वयोगटातील महिलांचा समावेश आहे.







