पुणे: पुणे शहरातील अनेक भागांमध्ये (Pune News) पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच भोसरी येथील पीएमआरडीए सेक्टर 12 मधील गृहप्रकल्पात रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रकल्पात पुरेशी पार्किंगची सोय उपलब्ध नसल्याने वाहन पार्किंगवरून सतत वाद निर्माण होत आहेत.

फ्लॅट धारकांच्या मते, दोन ते तीन फ्लॅटसाठी फक्त एकच पार्किंगची सोय आहे. पहिल्या टप्प्यातील फ्लॅटचे वाटप पूर्ण झाले ज्यामुळे ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. अनेक रहिवाशांनी प्रशासनाकडे आणि पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. “आमचं पार्किंग कुठे गायब झालंय? शोधून देता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
रहिवाशांनी चुकीच्या पार्किंग आराखड्याबद्दल देखील प्रशासनावर आरोप केला आहे. अनेक पत्रव्यवहार आणि तक्रारींनंतरही समस्येवर ठोस उपाय अद्याप झालेला नाही. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली असली तरी, समस्या कायम आहे.
तथापि, तक्रारीनंतर प्रशासनाने समस्या सोडवण्यासाठी पावले उचलली आहेत. रहिवाशी ठोस उपाययोजनेची प्रतीक्षा करत असून, भविष्यात त्यांच्या हक्काचे पार्किंग मिळेल की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.







