पुणे: पुणे आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘पुणे-छत्रपती संभाजीनगर’ द्रुतगती प्रकल्पामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून कागदावरच असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्ष सुरु होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या महामार्गासाठी तब्बल 2200 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, कामाला वेग देण्याचे आदेश दिले आहेत.

दोन टप्प्यांत होणार काम
१. खराडी ते शिरूर (एलिव्हेटेड मार्ग): पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी खराडी जंक्शन ते शिरूर बायपासपर्यंत 53.4 किमीचा सहा पदरी उड्डाणपूल बांधला जाईल.
२. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर: 192.5 किमीचा प्रवास पूर्णपणे नवीन ‘ग्रीनफिल्ड’ मार्गाने होईल. यामुळे सध्याच्या वळणावळणाच्या रस्त्यांवरून सुटका होणार आहे.
सध्या पुणे ते संभाजीनगर प्रवासासाठी 5 ते 6 तास लागतात. हा नवा महामार्ग पूर्ण झाल्यावर हे अंतर अवघ्या 3 तासांत कापले जाईल. शिरूर, नगर आणि संभाजीनगर या औद्योगिक पट्ट्यातील (MIDC) मालवाहतूक सुलभ होईल. वाळूज, शेंद्रा, जालना आणि बीड या भागांतील उद्योगांना यामुळे थेट पश्चिम महाराष्ट्राची बाजारपेठ जोडली जाणार आहे.







