अमित मुंडीक

पुणे: खराडी परिसरात बुलेट गाड्यांच्या मॉडिफाईड सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज करून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खराडी पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार तक्रारी येत असल्याने पेट्रोलिंगदरम्यान सापळा रचून 45 बुलेट व इतर दुचाकी वाहनांवर मोटार वाहन अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व त्यांच्या पथकाने संबंधित वाहनांचे मॉडिफाईड सायलेन्सर काढून टाकले आणि कंपनीचे मूळ सायलेन्सर बसविण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली.
जप्त केलेले मॉडिफाईड सायलेन्सर बुलडोझरखाली नष्ट करण्यात आले. या कठोर कारवाईमुळे परिसरातील बुलेटस्वारांमध्ये धाक निर्माण झाला असून, भविष्यात अशा प्रकारे कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांविरोधात तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.






