पुणे: पुण्यातील (Pune News) नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. येत्या गुरुवारी अनेक प्रमुख भागांमध्ये पाणी कपात (Water Cut) केली जाणार आहे. तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. खडकवासला धरणातून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा गुरुवारी, सकाळी 06:00 ते रात्री 12:00 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या वेळेत विविध विद्युत पंपिंग आणि वितरण व्यवस्थेच्या कामांसह महत्त्वाचे तांत्रिक काम पूर्ण केले जाणार आहे.

खडकवासला ते पर्वती जलकेंद्रादरम्यान नव्याने टाकण्यात आलेल्या 3000 mm व्यासाच्या मुख्य पाईपलाईनवर फ्लो मीटर बसवणे. तसेच, धरणातून आलेल्या 1400 mm व्यासाच्या दोन पाईपलाईन्सना 3000 mm च्या लाईनशी जोडणे.
वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या फेज 2 ची क्षमता वाढवण्यासाठी नवीन पाण्याच्या टाकीच्या भिंतीला कोअर कटिंग करण्याचे कामही होणार आहे. पर्वती (जुने व नवीन), वडगाव, लष्कर, वारजे, चिखली जलकेंद्रांमधील पंपिंग व्यवस्था आणि वितरण यंत्रणेची दुरुस्ती केली जाईल.
या परिसरांना फटका:
पर्वती (सर्व टँकर पॉइंट्स, MLR, HLR, LLR टाक्या), वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, वारजे जलकेंद्र आणि त्या अंतर्गत येणारे चांदणी चौक, गांधी भवन, पॅनकार्ड क्लब, शिवणे इंडस्ट्रीज परिसर, लष्कर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन आणि नव्याने समाविष्ट गावे बुस्टर पंपिंग अंतर्गत येणाऱ्या परिसरांमध्ये पाणी कपात केली जाणार आहे.
शुक्रवारी पाणी येईल, पण…
गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याने, शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. तरी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.





