Pune News: पुणे : पुणे एसटी विभागात प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता चालक आणि वाहक यांना ड्युटी सुरू करण्यापूर्वी अल्कोटेस्ट चाचणी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. चाचणीत योग्य आढळल्यानंतरच चालकांना बस चालवण्याची परवानगी दिली जाणार आहे. या निर्णयामुळे मद्यप्राशन करून ड्युटीवर येण्याच्या प्रकारांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पुणे विभागात सध्या 882 चालक, 1052 वाहक आणि 912 बस कार्यरत आहेत. या सर्वांची दररोज अल्कोटेस्टद्वारे तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक आगारात यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून तपासणीचे निकाल डिजिटल पद्धतीने नोंदवले जातील. भविष्यात शिस्तभंग कारवाई करताना या नोंदींचा वापर पुरावा म्हणून केला जाणार आहे.

मद्यप्राशन करून ड्युटीवर आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पहिल्यांदा दोषी आढळल्यास निलंबन, तर वारंवार नियमांचे उल्लंघन झाल्यास सेवासमाप्तीची कारवाई केली जाईल. यामुळे चालक आणि वाहकांमध्ये शिस्त वाढेल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेत सुधारणा होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, काही चालकांकडून मद्यप्राशन केल्याच्या तक्रारी येत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, आता नियमित तपासणीमुळे असे प्रकार कमी होतील आणि अपघातांची शक्यता घटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यासोबतच राज्य परिवहन व्यवस्थेत मोठा बदल करण्याची तयारी सुरू आहे. येत्या काळात एसटीच्या बस हळूहळू इलेक्ट्रिक केल्या जाणार आहेत. वर्ष 2037 पर्यंत संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे प्रदूषण कमी होईल आणि वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.







