पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडीनां चांगलाच वेग आला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत केंद्रात जाणार आणि ते उपपंतप्रधान होऊ शकतात, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुणे शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार या पुण्यात झळकलेल्या बॅनरने महायुतीत पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

पुण्यातील हांडेवाडी परिसरात दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून लावण्यात आलेला एक राजकीय बॅनर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवसेना (शिंदे गट) शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी हा बॅनर उभारला आहे. या फलकावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा फोटो असून “लाडक्या बहिणींचा आशीर्वाद… लाडका भाऊ लवकरच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार” असा थेट मजकूर लिहिला गेला आहे.

तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे,फोटो फ्लेक्सवर दिसत आहेत.सण-उत्सवाच्या निमित्ताने लागलेल्या या बॅनरने नागरिक आणि कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले आहे. दिल्लीतील सत्तापालटाच्या चर्चा सुरू असतानाच शिंदेंना ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून दाखवल्याने महायुतीत अंतर्गत तणाव वाढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात एकीकडे केंद्रीय राजकारणातील बदलांचे वारे वाहत असताना, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरात उमटलेले हे पडसाद आगामी काळात राजकारणाला कोणते नवे वळण देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






