पुणे: मावळ तालुक्याच्या (Pune News) राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या आणि महिला नेतृत्वाचा पाया रचणाऱ्या माजी आमदार रुपलेखा ढोरे (वय ७६) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने मावळने एक अभ्यासू आणि तितकीच कणखर लोकप्रतिनिधी गमावली आहे.

रुपलेखा ढोरे यांचा राजकीय प्रवास पंचायत समितीपासून सुरू झाला असला, तरी १९९५ ची विधानसभा निवडणूक त्यांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण ठरली. त्या काळात पती खंडेराव ढोरे यांच्यासह त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी तत्कालीन दिग्गज नेते मदनशेठ बाफना यांचा पराभव करून ओळख निर्माण केली. या विजयामुळे त्या मावळच्या पहिल्या महिला आमदार आणि भाजपच्याही मावळमधील पहिल्या आमदार ठरल्या.

ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांच्या निधनानंतर दोन मुले, दोन मुली आणि नातवंडांचा मोठा परिवार पोरका झाला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मावळ तालुक्यात व्यापार आणि व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.








