पुणे: पुण्याच्या रस्त्यांची अवस्था आणि शहरातील वाहतूक कोंडीवरून सातत्याने नाराजी व्यक्त होत असली, तरी आर्थिक क्षेत्रात शहराने दमदार कामगिरी केल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. देशातील आर्थिकदृष्ट्या सातत्याने वाढ करणाऱ्या महानगरांच्या क्रमवारीत पुण्याने अव्वल स्थान पटकावले आहे.

‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट’ने देशातील विविध भागांच्या आर्थिक प्रगतीचे विश्लेषण करून ही क्रमवारी तयार केली. यासाठी सुमारे 800 जिल्ह्यांचा अभ्यास करण्यात आला. उपग्रहातून मिळालेली माहिती, आर्थिक व्यवहार आणि विकासाशी संबंधित विविध बाबींचा विचार या मूल्यांकनात करण्यात आला. एप्रिल ते जूनदरम्यानच्या स्थितीच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला.

पुण्याला मिळालेल्या पहिल्या क्रमांकामागे शहरातील विविध उद्योगांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. आयटी आणि तंत्रज्ञान सेवा, वाहननिर्मिती, आधुनिक उत्पादन, शिक्षण तसेच नव्या कल्पनांवर आधारित व्यवसायांमुळे पुण्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

महानगरांच्या यादीत अहमदाबादने दुसरे स्थान मिळवले असून कोलकाता तिसऱ्या क्रमांकावर आहे. या शहरांमध्येही आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीच्या संधींमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे.
दरम्यान, या अहवालातून आर्थिक प्रगती केवळ मोठ्या महानगरांपुरती मर्यादित न राहता इतर शहरांमध्येही विस्तारत असल्याचे चित्र दिसत असून प्रादेशिक पातळीवरील विकासात जयपूर, नाशिक, सुरत, मुर्शिदाबाद आणि रंगा रेड्डी यांचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय दिमापूर, पंचमहल, आनंद, अयोध्या, रामपूर, बस्ती, शाल्मली, बौध आणि कोडरमा या जिल्ह्यांनीही चांगली प्रगती केल्याचे दिसून येत आहे.







