लोणी काळभोर, ता. 11 : हवेली व शिरूर तालुक्यात होत असलेल्या नागरीकरणामुळे ड्रेनेज आणि कचऱ्याची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर थेऊर (ता. हवेली) येथे जिल्हा परिषद आणि पीएमआरडीए (PMRDA) च्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘कचरा प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पा’ला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ग्रामस्थांचा हा विरोध आणि त्यांच्या भावना लक्षात घेऊन थेऊर येथे कचरा प्रकल्प होणार नाही, तो दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी प्रस्तावित केला जाईल, असा महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक निर्णय आमदार माऊली कटके यांनी जाहीर केला आहे.

पूर्व हवेलीतील विकासकामे आणि नागरिकांच्या समस्यांकडे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके दुर्लक्ष करत असल्याची टीका विरोधकांकडून वारंवार केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार कटके यांच्या पुढाकारातून कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे रविवारी (ता. 11) ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी थेऊर येथील प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्प न होणे संदर्भात आमदार माऊली आबा कटके यांना, थेऊर बचाव कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार कटके पुणे प्राईम न्यूजशी बोलताना ही माहिती दिली.

यावेळी हवेलीचे सभापती युवराज काकडे, माजी संचालक यशवंत कारखाना रामभाऊ कुंजीर, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, मारुती कुंजीर, काळूराम कांबळे, कावेरी कुंजीर, माजी उपसरपंच भरत कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे, सुखराज कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, बाळासाहेब बोडके, मोहन कुंजीर, व थेऊरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संदर्भात पुढे बोलताना आमदार माऊली कटके म्हणाले की, “हवेली असो किंवा शिरूर तालुका, सर्वच ग्रामपंचायतींच्या हद्दीत नागरीकरण प्रचंड वेगाने वाढत आहे. रस्ते, फ्लायओव्हर, मेट्रो, रिंगरोड आणि अंतर्गत रस्त्यांचे जाळे तयार होत आहे. मात्र, या विकासासोबतच कचरा आणि ड्रेनेजची समस्या बिकट होत असून त्यातून नागरिकांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.”
या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून जागांची पाहणी करून थेऊर येथे सुमारे 18 ते 20 किलोमीटर अंतराच्या सोयीसाठी कचरा प्रक्रिया क्लस्टर प्लांट करण्याचा विचार होता. मात्र, थेऊर व परिसरातील ग्रामस्थांनी या कचरा प्रकल्पाला तीव्र आक्षेप नोंदवला होता. “या परिसरात कचरा आणि प्रकल्प दोन्ही नकोत” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.
यावर स्पष्टीकरण देताना आमदार कटके म्हणाले, “थेऊर परिसरातील ग्रामस्थांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. कोणाच्याही भावना दुखावून किंवा कोणालाही न दुखवता हा प्रश्न सोडवला जाईल. या प्रकल्पाबाबत विभागीय आयुक्त साहेबांशी सविस्तर चर्चा करून हा कचरा प्रक्रिया प्लांट थेऊरऐवजी दुसऱ्या सोयीच्या व सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येईल. यावर निश्चितच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.”
“कचरा प्रकल्पावर राजकारण करू नये!”
या संवेदनशील मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर टोला लगावताना आमदार कटके म्हणाले की, “कचरा समस्येवर राजकारण करण्याचे काहीच कारण नाही. लोकप्रतिनिधी आणि आमदारांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. कचऱ्याची विल्हेवाट लावणे हेही गरजेचे आहे आणि ग्रामस्थांच्या आरोग्याचे रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच मार्ग काढला जाईल.” आमदार माऊली कटके यांच्या या आश्वासनामुळे थेऊर व परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, आता प्रशासन या प्रकल्पासाठी कोणती पर्यायी जागा निवडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






