पुणे: पावसाळ्यात सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने वन विभागाने गर्दी नियंत्रणासाठी नवीन व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. किल्ल्याची सुरक्षित क्षमता निश्चित करून त्यानुसारच पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. ही मर्यादा पूर्ण झाल्यानंतर काही काळासाठी नवीन पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.

सिंहगडाची कॅरिंग कॅपॅसिटी निश्चित करण्याचे काम वैज्ञानिक पद्धतीने सुरू आहे. पर्यटकांची संख्या, वाहनांची गर्दी आणि किल्ल्यावरील उपलब्ध सुविधा यांचा विचार करून ही क्षमता ठरवली जाणार आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्यावर AI आधारित डिजिटल मॉनिटरिंग यंत्रणा आणि CCTV कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे.

पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यापूर्वीच गर्दीची स्थिती समजावी, यासाठी स्वतंत्र मोबाइल ॲपही तयार करण्यात येत आहे. या ॲपच्या माध्यमातून सिंहगडावरील गर्दी, पार्किंगची उपलब्धता आणि विविध पर्यटनस्थळांची माहिती घरबसल्या मिळू शकणार आहे. या ॲपचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक अभिजित वायकोस यांनी दिली आहे.

दरम्यान, किल्ल्यावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही वन विभागाने दिला आहे. तसेच किल्ल्यावर कचरा टाकू नये, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करू नये, मद्यपान करून प्रवेश करू नये आणि मोठ्या आवाजात संगीत वाजवू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.







