पुणे : पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे समोर आली आहे. 10 वर्षीय अल्पवयीन मुलगी मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास लेंडेस्थळ परिसरातील ओढ्याजवळ झाडाजवळ तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर आळेफाटा पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना एका 25 वर्षीय तरुणावर संशय आला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. प्राथमिक तपासात त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर मुलीचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
विशेष म्हणजे, मुलीचा शोध सुरू असताना संशयित तरुण इतर ग्रामस्थांमध्ये मिसळून पोलिसांना मदत करत असल्याचे समोर आले. तो पोलिसांसोबत सीसीटीव्ही फुटेजही पाहत होता. मात्र तपास पुढे जात असताना पोलिसांचा त्याच्यावरील संशय वाढला आणि अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी मुलीच्या घराशेजारी राहत होता. ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीला घरातून बाहेर नेल्याचा संशय आहे. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीची सखोल चौकशी केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. दरम्यान, या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.







